Tuesday, 12 May 2020

कमवून दाखवलं!

तन खत्री गेले. एकेकाळी हजारो लोकांना जुगाराचा नाद लावणारा मटका किंग गेला. 'नशीब फळफळणे' या म्हणीला 'मटका लागला का?' आणि 'मटका लग गया क्या?' अशी पर्यायी म्हण देऊन मराठी आणि हिंदी भाषेत मोलाची भर घालणारा खत्री गेला. खत्री गेल्यानंतर पुन्हा आकड्यांची उजळणी सुरू झाली. सोशल मीडियातून आकड्यांवर चर्चा झडत असतानाच त्याच दिवशी महाराष्ट्रातील नव्हे, देशातील जनतेला नवा आकडा कळला. थोडा थोडका नव्हे तब्बल १४३ कोटींचा आकडा कळला. हा आकडा कळताच मराठी माणसाची छाती गर्वाने फुगण्याऐवजी डोळेच पांढरे झाले. त्याला निमित्तही तसंच ठरलं. निमित्त होतं विधान परिषद निवडणुकीचं.

महाराष्ट्राला माहित नसलेला पहिला मटका फुटला तो विधानसभा निवडणुकीच्यावेळी. तेव्हा पहिल्यांदाच महाराष्ट्राला ११ कोटीचा आकडा कळला. लॉच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देऊन विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिलेल्या युवराजांची अर्थात दस्तूरखुद्द आदित्य ठाकरे यांची ही संपत्ती होती. तब्बल ११ कोटी. महाविद्यालयीन जीवनातच हाडाची काडं करून कमावलेली ही संपत्ती. आपल्याकडे चुलतेमालते, सोयरेधायरे घरी आले की मुलांच्या हातावर खाऊसाठी पैसे देतात. जमले असतील पैसे, वाढली असेल संपत्ती म्हणून त्याकडे महाराष्ट्राने दुर्लक्ष केलं. त्यानंतर महाराष्ट्रात दुसरा मटका फुटला आणि मर्द मराठी माणूस कुठेच कमी नसल्याचं सिद्ध झालं. थेट सरसेनापतींचे वारस असलेल्या धाकल्या सेनापतींची संपत्ती जगाला कळली. थोडीथोडकी नव्हे तब्बल १४३ कोटींची ही संपत्ती. पण यासाठी भाजपचे आभारच मानले पाहिजे. त्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदाचा आग्रह अमान्य केला नसता तर महाराष्ट्रात दुसरा मटका कधीच फुटला नसता. हा मटका फुटल्याने दोन बंगले, दागिने, ठेवी, बाँड्स, शेअर्स... अशी मायंदळ स्थावर, जंगम मालमत्ता ठाकरे कुटुंबीयांकडे असल्याचं महाराष्ट्राला पहिल्यांदाच समजलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला आणि त्यानिमित्ताने त्यांची संपत्ती जगजाहीर झाली. त्यांच्याकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याप्रमाणं स्वत:च्या मालकीचं वाहन नसल्याचंही या निमित्ताने महाराष्ट्राला समजलं. विशेष म्हणजे त्यांच्याकडे शेतीही नाही. त्यामुळे सुप्रियाताईंप्रमाणे ही सर्व कमाई शेतीच्या उत्पन्नातून कमावल्याचा कांगावा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मालकीचं वाहनच नसल्याने शिववड्याची गाडी लावून मिळकत केली असणार असंही समजण्याचं कारण नाही. फोटोग्राफीतून बक्कळ पैसा कमवता येतो, पण तसं समजायला तो काही त्यांचा फुलटाइम व्यवसायही नाही. त्यामुळे त्यांनीच शपथपत्रात नमूद केल्याप्रमाणे ही सर्व मिळकत वेतन, डिव्हिडंड फंड, कॅपिटल गेन आणि व्यवसायातून आली आहे. मराठी माणूस हा गुंतवणूक, शेअर्स वगैरेच्या भानगडीत पडत नाही. त्यात रिस्क असते म्हणून मराठी माणूस ही रिस्क कधीच घेत नाही. आपली नोकरी भली आणि महिन्याचा पगार भला हीच मराठी माणसाची मानसिकता. पण मराठी माणसाच्या या मानिसकतेला छेद देण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'करून दाखवलं' आहे. त्यामुळे 'करून दाखवलं' ते 'कमवून दाखवलं' हा ठाकरे कुटुंबाचा प्रवास अचंबित करणारा वाटणं साहजिकच आहे. मराठी अस्मितेला हवा देत '८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण' या नव महाराष्ट्र घडविण्याच्या ऐतिहासिक मांडणीतून काय काय साध्य करता येऊ शकतं यांचं हे उत्तम उदाहरणच म्हणावं लागेल.

शिवसैनिक असो की कोणताही साधा मराठी माणूस. आयुष्यभर खस्ता खालल्यानंतर आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या हातात जेमतेम चार दीडक्या येतात. मुलांची लग्न, आजारपण आणि राहिलेले कर्जाचे हप्ते भरल्यानंतर त्याच्या हातात काही उरत नाही. त्यामुळे डोळे मिटेपर्यंत त्याला जगण्याची भ्रांत लागलेली असते. नोकरीधंद्याला असतानाच मुलाला कुठेतरी चिटकवण्यासाठी त्याची धडपड सुरू असते. त्यासाठी तो अनेक उंबरे झिजवतो. वय वगैरे विसरून अपमानही सहन करतो. कधीतरी काम होतं. कधी नाही होत. निदान निवृत्तीनंतर आपल्या जागी आपल्या मुलाला चिटकवावं म्हणून मग त्याची धडपड सुरू होते. आता तर अपवाद वगळता पीटी केसही राहिल्या नाहीत. जगण्याचा असा संघर्ष सुरू असतानाच एखाद्या नेत्याची संपत्ती जेव्हा जगजाहीर होते, त्यावेळेस त्याचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहत नाही. एवढी वर्षे झिजूनही आपल्या हाती काही लागलं नाही, मग कामधंदा न करता नेत्यांकडे पैका येतो कुठून? त्यांचा व्यवसाय तरी काय? त्यांना मटका लागला तरी कधी? असे प्रश्न या हताश मराठी माणसाला पडल्या वाचून राहत नाही. असो.

एक गोष्ट आठवली. शरद पवारांना उद्देशून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, 'तुमची संपत्ती मला द्या आणि माझी संपत्ती तुम्हाला घ्या.' बाळासाहेबांच्या या वाक्याने किती बळ यायचं, समोरच्या व्यक्तीने एवढा पैसा कुठून कमावला असेल याचं कुतुहूल वाटायचं. ती व्यक्ती भ्रष्टाचारी वाटू लागायची. आज ठाकरे कुटुंबीयांची संपत्ती पवारांपेक्षा अधिक असल्याची बातमी वाचनात आली. गंमत म्हणजे पवारांनीच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याचा आग्रह केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. आता विधानपरिषदेचा अर्ज भरताना अनायसे ठाकरे कुटुंबाची संपत्तीही जगजाहीर झाली. ही सुद्धा पवारांचीच खेळी म्हणायची का?

No comments:

Post a Comment