राजकारणातला सूर्य हरघडी पूर्वेला उगवत नसतो, तो कधी कधी पश्चिमेलाही उगवतो. याचं मर्म ज्या राजकारण्यांना उमगतं त्या राजकारण्यांचा यशाचा सूर्य कधीच मावळत नसतो. कधीकाळी ज्यांच्या अंगणात 'कमल'दले उमलायची आणि ज्यांच्या शब्दांवर अनेकांची राजकीय कारकिर्द घडायची-बिघडायची त्या एकनाथ खडसे ऊर्फ नाथाभाऊंच्या अंगणात सध्या चिखलाशिवाय काहीच सापडताना दिसत नाहीये. त्याची कारणंही राजकीयच आहेत. महत्वाकांक्षेची कमले जिथे उमलू लागतात तिथे शह-काटशह बसणारच. आता तर ना पूर्वीची भाजप राहिली, ना पूर्वीचं अनुशासन. नव्या सल्तनीत अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, शौरींपासून ते यशवंत सिन्हापर्यंतच्या धुरंधरांना अडगळीत जावे लागले तिथे नाथाभाऊ सारख्यांची कथा ती काय?
त्यामुळे दादांनी सांगितलेला हा 'बंच ऑफ थॉट' मनावर घेऊन नाथाभाऊ तुम्ही भूमिका घ्याल असं वाटलं होतं. हा निर्वाणीचा इशारा समजून पुढे काय करायचं? याचा विचार कराल असंही वाटलं होतं. भाजपला खिंडार पाडून ताकद आणि उपद्रव मूल्य दाखवाल असाही कयास होता. पण, तुम्ही तर ऑर्ग्युमेंट आणि स्पष्टीकरणाच्या भानगडीत पडलात. दादांनाच पक्षातील त्यांच्या योगदानाची आठवण करून देऊ लागलात. किमान आजच्या सल्तनीतील सूर्य कोणत्या दिशेने उगवला हे तरी पाह्यचे ना? बरं एवढी टोकाची भूमिका घेतल्यानंतर एक घाव दोन तुकडे तरी करायचे. एवढी सार्वजनिक अहवेलना होऊनही तुम्ही ज्या फांदीवर बसलात त्याच फांदीवर घाव घालत असाल तर तुमचा शेखचिल्ली होणार नाही तर काय होणार? नाथाभाऊ, रिकाम्या भांड्याचा खणखणाट फार असतो, पण त्याचा काहीच उपयोग होत नसतो हे दोन पक्ष फिरून आल्यानंतर नारायण राणेंना समजलं, ते तुमच्या सारख्या मास लीडरला समजू नये याचं आश्चर्य वाटत. अडवाणींचं योगदान साबरमतीत बुडविणाऱ्या नव मसिहांसमोर तुम्ही तुमच्या योगदानाची उजळणी करत असाल तर ते तुम्हाला वनवासाला पाठवणार नाहीत तर काय करणार?
नाथाभाऊ, राजकारणात पुढारी असून चालत नाही, त्यासाठी राजकारणी व्हाव लागतं. अन् उतरत्या वयाबरोबर तुमच्यातल्या राजकारण्यालाही उतरती कळा लागली आहे. शिवाय तुमचा आक्रमक स्वभाव पाहता जुळवून घेणं, पुढे पुढे करणं तुमच्या स्वभावात नाही. मेरिटवर सर्वकाही मिळवण्याची तुमची धमक, पण तुमच्या मेरिटची कदर करायला आजच्या घडीला स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंसारखा गॉडफादरही नाही. त्यामुळे तुमची आज ही अवस्था झालीय. बहुजन समाजातला असल्यामुळे डावललं जात असल्याची खदखद तुम्ही एकदा बोलून दाखवली होतीच, त्याचाही तुम्हाला फटका बसला नसता तर नवलच! तसंही 'रेशीम बागे'त बहुजन वर्गातील कमळे फार काळ फुलंत नाहीत. गोपीनाथ मुंडे यांनाही पक्षात बरेच अवमान सहन करावे लागले होते. तेही पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत होते. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दा खातर ते भाजपमध्ये थांबले. तुम्ही तर या सर्व गोष्टींचे साक्षीदार आहात. मुंडे यांच्यासारख्या बहुजन ओबीसी नेतृत्वात पक्षाला अनेकदा नमवण्याची धमक होती। त्यांच्या छायेत वाढून नाथाभाऊ तुम्ही त्यांच्याकडून काय शिकलात? भ्रष्टाचाराचे आरोप होतात, ईडीची चौकशी होते अन् काही महिने आत राहावं लागतं, तरीही भुजबळ मंत्री होतात. याचा अर्थ पक्षाला भुजबळ हवे असतात. इकडे तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात, निमित्त मिळतं अन् तुमचा काटा काढला जातो, तुम्हाला दिलेल्या सत्तापदांची उजळणी केली जाते, नाथाभाऊ याचा अर्थ काय होतो? तरीही तुम्ही संत एकनाथासारखे कुत्र्याच्या मागे तुप घेऊन धावत आहात, याचं आश्चर्य वाटतं. पण ज्यांचा तुपाऐवजी सुपातलं ओढण्यावर भर आहे, त्याचं काय करणार? त्यामुळे नाथाभाऊ, पुरे आता. 'रेशीम बाग' व्हाया वाहणाऱ्या या मतलबी वाऱ्यांचा अंदाज वेळीच घ्या. आज ना उद्या तुम्हाला भूमिका घ्यावीच लागणार आहे. पण ही भूमिका घेताना काळ सोकावू देऊ नका. अन्यथा अडवाणींप्रमाणेच सध्या नाथाभाऊ काय करतात? असा प्रश्न विचारला जाईल.

No comments:
Post a Comment