Wednesday, 4 August 2021

'स्व'च्या शोधात निघालेली 'प्राजक्तप्रभा'!

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा 'प्राजक्तप्रभा' हा पहिलावहिला कवितासंग्रह आपल्या भेटीला आला आहे. सेलिब्रिटी होण्यापूर्वीचं आणि त्यानंतरच अनुभवविश्व म्हणजे प्राजक्ताच्या या कविता आहेत. तब्बल 32 कविता या कवितासंग्रहात आहेत. मराठीसह एक इंग्रजी आणि काही हिंदी कवितांचं संचित या पहिल्याच कवितासंग्रहात प्राजक्ता घेऊन आली आहे. काही दीर्घ कविता आहेत. तर काही चारोळ्याही यात आहे. 'प्राजक्तप्रभा'तील कविता आणि तिची भाषा ही साधी आणि सरळ आहे. ही कविता प्रतिमा आणि प्रतीकांच्या जाळ्यात गुरफटलेली नाही. अलंकारांचा रतीबही तिने घातलेला नाही. प्राजक्ताची कविता पाऊस, प्रेम, कला आणि अध्यात्म या वर्तुळाभोवती फिरते. तिची कविता थेट वास्तवाशी भिडते. ती कल्पना विश्वात रमत नाही. म्हणूनच त्यात गुंतागुंत नाही. तर थेट साधलेला हा संवाद आहे.  
'प्राजक्तप्रभा'मधून कवयित्री स्वत:च स्वत:शी संवाद साधताना दिसते. त्यातून ती स्वत्वाचा शोध घेते. त्यामुळे कधी ती फ्लॅशबॅकमध्ये जाते तर कधी वर्तमानाशी भिडताना दिसते. त्यामुळेच ती व्यक्त होताना उसना अभिनिवेश आणताना दिसत नाही. म्हणूनच तिची कविता गेयता, मीटर, पंच याच्या भानगडीत पडताना दिसत नाही. ही कविता मुक्तछंदातील आहे. तिच्या कवितेत तत्त्वज्ञानाचा आव नाही की आक्रस्ताळेपणा नाही. आज मानवी जीवन अधिक गुंतागुंतीचं झालं आहे. धावपळीचं झालं आहे. मात्र, या कोलाहलात वावरताना कवयित्रीला जो अनुभव आला... ते जग जसं दिसलं ते शब्दात पकडण्याचा प्रामाणिक प्रयत्न तिने केला आहे. हा अनुभव शब्दातून मांडत असतानाच काही ठिकाणी हा अनुभव ती दृश्यात्मकतेद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तिच्या अनेक कवितांमध्ये ही दृश्यात्मकता आली आहे. 'आठवत असेल त्याला?', 'प्रिय पावसाळा', 'ध्यास' आणि 'मायावी दुनिया' या कवितांमधून ही दृश्यात्मकता कमीअधिक प्रमाणात दिसून येते. 'आठवत असेल त्याला?' या कवितेत ती अधिकच प्रखरपणे जाणवते. ती म्हणते...

आज पुन्हा धो धो कोसळणाऱ्या पावसाला बघून...
त्याच्या आठवणींचे धबधबे बरसले...
पावसाचे नि त्याचे नाते मनात धिंगाणा घालून गेले...

आठवत असेल का त्याला
ती पहिलीच वादळभेट...?
जेव्हा romantic होण्याऐवजी
घाबरून गेले होते मी...

'आठवत असेल त्याला?'... असं सांगताना कवयित्री प्रेमाच्या पहिल्या भेटीलाही उजाळा देते. तिच्याच प्रश्नांना तिच उत्तरं देत तरलपणे व्यक्त होते आणि पुढे जाते. आपलं अनुभव विश्व रेखाटताना ते प्रश्नांकित करून त्याला उत्तर देणं हे तिच्या कवितेचं वैशिष्ट्ये आहे.

ती पहिली भेट...
आकाशातल्या पक्ष्यांच्या थव्यांच्या
माळेप्रमाणे ओझरती

ती पहिली भेट...
कित्येक वर्षातून एकदा घडणाऱ्या
खग्रास सूर्यग्रहणाप्रमाणे अभासमय

या कवितेत तिने प्रतिमांचा अत्यंत खुबीने वापर केला आहे. त्यातून प्रेमाची अगाधता आणि खोल व्याकूळताही तिने आशयगर्भपणे व्यक्त केली आहे. एकीकडे हे सुरू असतानाच व्यक्तिगत पातळीवर तिच्या अंतर्मन आणि बहिर्मनात सुरू असलेला अंतर्विरोधही ती कवितेतून व्यक्त करते. हा अंतर्विरोध मांडताना जीवनातील विसंगतीवर ती प्रखरपणे आसूडही ओढताना दिसते. 'मायावी दुनिया', 'सब माया है', 'सत्य दिसू दे', 'कला' या कवितांमधून ती हे फटकारे लगावताना दिसते. तर 'फकीर' या कवितेतून ती अधिक गूढ होते....

सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत त्याच्याकडे...
सगळ्या कुलपांच्या चाव्या...
माझ्या ध्येयापर्यंतच्या सगळ्या वाटा,
नि मी आनंदी होण्याच्या सर्व तऱ्हा...

तर 'प्राजक्तप्रभा'मध्ये म्हणते.

इथे मी तुझा जप करतेय
तुला तिथे कळतंय ना?
भेटताक्षणी आपण
गतजन्म आठवेल ना?

तिचं जग असं भारलेलं आहे. म्हणून तिची कविता आजचे भौतिक प्रश्न, सामाजिक समस्यांना प्रखरपणे भिडताना दिसत नाही. मात्र, तिच्या 'ध्यास' या कवितेत स्त्री वेदनेचा हुंकार डोकावून जातो.

रात्र जरी झाली,
तरी मार्गक्रमण करायचं आहे, 
अमावस्या जरी साथीला,
तरी आशेचा किरण मनी बाळगायचा आहे...

एकटी आहेस तू...
कुत्री ही भुंकणारच...
काहींकडे दुर्लक्ष करून, काहींना हाकलून लावून,
काहींना हुंगून देऊन मग दूर लोटायचं आहे,
अन् न घाबरता, न डगमगता,
तुझा तुलाच रस्ता कापायचा आहे...

पुढे याच कवितेत ती आशावादीही होते. ती म्हणते,

ध्यानात घे,
सूर्योदयापूर्वीच सगळ्यात जास्त काळोख असतो,
आता काही क्षणातच लख्ख उजाडणार आहे
थकू नकोस... 
आशा सोडू नकोस...
अन् काहीही झालं तरी लक्षात ठेव...
तो तुझ्या सोबतीस आहे...
तो तुझ्या सोबतीस आहे....

स्त्रीयांकडे बुभुक्षित नजरेने पाहणाऱ्यांवर या कवितेतून ती भाष्य करते. या कवितेत सोबतीला असणारा हा 'तो' कोण आहे? हा प्रश्नही ती वाचकांवर सोडून जाते. तो प्रियकर असेल, नवरा असेल किंवा ईश्वरही असेल. तो कोण आहे, हे ज्यांचं त्यानं ठरवावं, असं तर तिला सूचवायचं नाही ना?, असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही. एक स्त्री म्हणून ती तिच्या आयुष्यात आलेल्या स्थित्यंतरावरही भाष्य करते. करिअरसाठी पुणं सोडून मुंबईत यावं लागलं. हे नवखं, अनोळखी शहर. कसं होणार या शहरात? या विचारानं तिच्या मनाची घालमेल होते, ही घालमेल 'आयुष्य माझं' या कवितेतून तिने अत्यंत उत्कटपणे मांडली आहे.

आयुष्य माझं वळण घेतंय...
एकीकडे संसारातून संन्यास,
दुसरीकडे, प्रेमाचा मात्र मोह धरतंय...
आयुष्य माझं खरंच खूप मोठ्ठं वळण घेतंय...
या पाऊलवाटेवरून वळण घेताच... राजमार्ग येणार,
अशी खात्री बाळगतंय...
आयुष्य माझं...

त्यानंतर 'मुंबई-पुणे-मुंबई' या सरधोपट कवितेतून तिचं आयुष्य विस्तारत जातं. याचं दर्शन तिच्या इतर कवितांमधूनही दिसून येतं. तिच्या काही कविता चांगल्या आहेत. काही बऱ्या आहेत. तर काही यथातथा आहेत. पण तिचा प्रयत्न दमदार आहे. तूर्तास, प्राजक्ता माळीच्या कवितेला पुढच्या प्रवासासाठी सुयश चिंतितो आणि सदिच्छा व्यक्त करतो.