Friday, 19 May 2023

मौनानंतरच्या अभिव्यक्तीची कासाविशी 'मौन झाले बासरी'

फूल आणि सुगंध यांच्यात जे अंतर असतं, तेच अंतर नि:शब्द मौन आणि बोलक्या मौनात आहे. मौनाची ही अव्याहत यात्रा अंतर्मनात सुरू असते. तो अनाहत प्रवास असतो. सुप्रिया पुरोहित-हळबे यांच्या 'मौन झाले बासरी' या काव्यसंग्रहातून त्याची प्रचिती जागोजागी येते. अन् आपण एका अनाहत प्रवासाचा अनुभव घेऊन तृप्त होतो. 'मौन झाले बासरी' हा सुप्रिया पुरोहित-हळबे यांचा पहिलावहिला काव्यसंग्रह आहे. आपल्या पहिल्याच कवितासंग्रहातून कवयित्री एकूण 75 कविता घेऊन आली आहे. सुप्रिया यांची कविता निसर्ग, पाऊस आणि प्रीती या तीन गोष्टींशीपाशी फिरत राहते. निसर्ग, पाऊस आणि प्रीती या तीन संयुगातूनच त्या शब्द आणि प्रतिमांच्या उत्कट अविष्कारातून व्यक्त होतात. मौनानंतरचं व्यक्त होणं, मौनानंतरच्या अभिव्यक्तीची कासाविशी म्हणजे सुप्रिया यांच्या या कविता आहेत. 


काव्यसंग्रहातील मनोगतात सुप्रिया यांनी त्यांच्या कवितेच्या प्रवासाचा धांडोळा घेतला आहे. "या संग्रहातील प्रत्येक कविता म्हणजे माझा एकांतातील स्वसंवाद आहे. मनाची उन्मनी अवस्था आहे. प्रत्येक कविता थेट हृदयातून, मनाच्या उत्कटावस्थेतून आलेली आहे. माझ्या मनातील हे विविध भावतरंग म्हणजे- मौन झाले बासरी...", कवयित्रीने तिची कविता काय आहे? हेच या मनोगतातून स्पष्टपणे मांडलंय. त्या पुढे म्हणतात, "अजिबात न लिहिणारी, त्यानंतर व्यक्त होऊ लागलेली आणि दहा वर्षाच्या दीर्घ सुप्तावस्थेनंतर पुन्हा व्यक्त होणारा म्हणजेच मौनाकडून वृत्तबद्ध कवितेपर्यंतचा माझा प्रवास म्हणजेच - मौन झाले बासरी..." या हितगुजातून कवयित्रीने या काव्यसंग्रहाला 'मौन झाले बासरी' हे नाव का दिलं हेही अधोरेखित केलंय. 

सुप्रिया यांच्या कविता निसर्ग, प्रीती आणि पाऊस या तीन घटकांभोवती फिरत असल्या तरी त्या एकसुरी झालेल्या नाहीत. त्यांची कविता संवादी आहे. त्या कवितेतून संवाद साधतात. त्यामुळे त्यांची कविता वाचताना आपलाच आपल्याशी संवाद सुरू होतो आणि आपण त्या कवितेत हरवून जातो. कवयित्रीची कविता आत्मनिष्ठ असली तरी ती वैयक्तिक नाही. त्यांच्या अनुभवाचं सामान्यिकरण झालेलं दिसून येतं. प्रत्येक कविता वाचताना ती कविता आपली आहे हे पदोपदी जाणवतं आणि हीच सुप्रिया यांच्या कवितेची ताकद आहे. 'मौन झाले बासरी'तून प्रतिमा, प्रतिकांच्या दुनियेची मुशाफिरी होते अन् प्रत्येक शब्दागणिक कविता उलगडत जाते. सुप्रिया यांची कविता लयबद्ध आहे. कवयित्री स्वत: गझलकार असल्याने त्यांच्या कवितेत गेयता अधिक आहे. प्रतिमांची रचना आणि शब्दांच्या नादामुळे सुप्रिया यांच्या कवितेचं सौंदर्य अधिकच खुलून उठतं.

भोगते सरींची सरगम,

सोसते उन्हाचे गाणे,

पण आवडते ना तिजला,

वाऱ्याचे उगाच छळणे...

कवितासंग्रहातील 'कवितेची वेल' या पहिल्याच कवितेतून कवयित्री प्रतिमा आणि शब्दांची अशी मुक्त उधळण करताना दिसते. 

तुला पाहताना अशी लाजले रे,

जणू तारका मी नि तू चांदावा,

इथे लाजण्याला निळा पूर आला,

कितीदा मनी गायला मारवा...

किंवा 

नेत्रदले सूर्याची फुलता,

इंद्रधनू उलगडले,

रांगत गवताच्या गादीवर,

बाळफूल महिरपले...

'शहारे गुलाबी'  आणि 'चैतन्यस्पर्श' या कवितेतूनही कवयित्री अशीच शब्दांची आणि प्रतिमांची पखरण करत मुक्तपणे व्यक्त होते. या ओळीतून कवयित्री प्रीतभावना उत्कट आणि तितक्याच तरलपणे मांडते.

सप्तर्षी तोरण वाटा,

ओसाड रुक्ष काटेरी,

तू निघून गेल्यावरती,

विस्कटली दुनिया सारी...

'तू निघून गेल्यावरती' या कवितेत कवयित्री अशी हळूवार व्यक्त होताना आपल्या मनातील सल बोलून दाखवते. 

मी केशर सायंकाळ,

तू निळ्या फुलांचा झेला,

तू मला पांघरून घेता,

जणू कशिदाकारी शेला...

किंवा

ऊन नदीत निजले,

नभी केशर सांडले,

क्षितिजाच्या डोळ्यांमध्ये,

तुझ्या छबीला पाहिले...

किंवा 

प्राजक्ताच्या फुलांमध्ये,

मला होतो,

तुझा भास...

गहिवर हा मनाचा,

लागलेली,

तुझी आस...

किंवा 

माझ्या मनात पाऊस,

लाजे गुलाबी पाऊस,

डोळा भेट होता रुजे,

माझ्या देहात पाऊस

या आणि इतर कवितांमधून कवयित्री पाऊस, निसर्ग आणि प्रीतीचं उत्कट दर्शन घडवत असते. 'मौन झाले बासरी'तील कविता लयबद्ध आहेत, पण त्या साचेबद्ध नाहीत. या कवितासंग्रहातील त्यांची एक कविता अभंगाच्या धाटणीची आहे. आणि ही कविता चांगलीच जमून आली आहे. 

मनासी लागली ! तुझी किती आस !

अंतरी हा ध्यास ! कवितेचा !!

किती गे झटावे ! मनी चिंतवावे !

शब्द आळवावे ! तुझ्यासाठी !!

'शब्दांची शिदोरी' ही कविता अभंगाच्या धाटणीची आहे. अभंगाच्या शैलीतूनही कवयित्रीने शब्दांची ओढ आणि शब्दांचं महत्त्व पटवून देण्याचं काम केलं आहे. कवयित्रीने आपल्या कवितेत पारंपारिक प्रतिमा, प्रतिकं आणि मिथकांना टाळलंय. कवयित्रीने आपल्या कवितेतून स्त्रियांच्या प्रश्नांची चर्चा केलेली नाही. तिच्या कवितेत दु:ख, वेदना आहेत. पण त्या वेगळ्या अर्थाने आल्या आहेत. त्या स्त्रियांचं दु:ख किंवा वेदना म्हणून आलेल्या नाहीत. म्हणूनच सुप्रिया यांच्या कविता स्त्रीवादी आहेत असं म्हणता येत नाही. कोणत्याही साच्यात स्वत:ला अडकवून न ठेवणाऱ्या या कविता आहेत. निसर्ग, पाऊस आणि प्रीतीचा अनोखा मिलाफ असणाऱ्या या कविता निखळ आनंद देणाऱ्या आहेत. तुम्हालाही हा काव्यसंग्रह वाचताना नक्कीच आनंद मिळेल. सुप्रिया यांनी 'मौन झाले बासरी'तून साहित्य क्षेत्रात हळूवार दस्तक दिलीय. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!!!


मौन झाले बासरी

कवयित्री :  सुप्रिया पुरोहित हळबे

प्रकाशक – अष्टगंध प्रकाशन

पृष्ठे – ९४

मूल्य : २००/- रुपये


No comments:

Post a Comment